महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्यामार्फत “करिअर कट्टा”चे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत “IAS आपल्या भेटीला” आणि “उद्योजक आपल्या भेटीला” या दोन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे दोन्ही उपक्रम 365 दिवस दररोज एक तास याप्रमाणे राबविण्यात येणार आहेत.

“IAS आपल्या भेटीला” या उपक्रमांतर्गत दिल्ली, मुंबई तसेच भारतामध्ये कार्यरत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आणि भारतीय प्रशासकीय सेवेच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून शहरी भागात न येता त्यांच्या दारातच त्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.

“उद्योजक आपल्या भेटीला” या उपक्रमांतर्गत ज्या महाविद्यालयीन युवकांना स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांचे उद्योजकीय कौशल्य वाढीस लागण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चालू असलेल्या विविध संकल्पनांची ओळख विद्यार्थ्यांना करुन देण्यात येणार आहे. या उपक्रमात विविध बँकांचे अधिकारी, प्रशासकीय विभागाचे अधिकारी तसेच अनेक तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे.